शटडाऊनमुळे पाणी टप्पे दोन दिवस लांबणीवर

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात सोलार यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कामासाठी येत्या शुक्रवारी (दि.१७) सकाळी ११ ते सायंकाळी ४ या पाच तासांच्या अवधीसाठी महानगरपालिकेच्या वतीने शटडाऊन घेण्यात येणार आहे. या काळात फारोळ्यातून ७००, १२०० आणि ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहराच्या दिशेने होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने शुक्रवार, शनिवारी पाण्याचे टप्पे पुढे ढकलले जाणार आहेत.
शहराला सध्या १२०० मिमी, ७०० मिमी आणि ९०० मिमी व्यासाच्या योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या योजनांतून शहरात दररोज १५५ एमएलडी पाणी मिळते. तिन्हीपैकी एका जलवाहिनीला गळती लागल्यास दुरुस्तीसाठी पुरवठा बंद केला जातो. एक तासही शहरात येणारे पाणी बंद पडले की, पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ महापालिका पाणीपुरवठा विभागावर ओढावते. त्यात फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात मनपाच्या वतीने २५० केव्ही क्षमतेची सोलार यंत्रणा बसविण्यात आली आहे. या सोलार यंत्रणेतून वीज निर्मीती सुरू करण्यासाठी नेट एनर्जी मीटर बसविण्यात येणार आहे. नक्षत्रवाडीतील पंपगृहाची विद्युत भार क्षमता वाढविण्यासाठी मिटरिंग असून, त्यासाठी महावितरणने ४ क्युबिकलची कामे करण्यात येणार असल्याने शटडाऊन देण्याची मागणी केली होती. याच कालावधीत मुघलवाडी येथे प्रस्तावित असलेल्या ३३/११ केव्ही उपकेंद्रासाठी जमीन स्वच्छतेचे काम महावितरणच्या वतीने केले जाणार आहे. महावितरण आणि महापालिकेच्या विद्युत विभागाने शटडाऊनची मागणी केल्याने शुक्रवारी शटडाऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे (यांत्रिकी) उपअभियंता दत्तात्रय गायकवाड यांनी दिली आहे.